नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतीला आधुनिक बनवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा स्वीकार करावाच लागेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीमध्ये भारतीय कृषी संशोधन संस्थेत पीएम किसान सन्मान संमेलन २०२२ चं उद्घाटन करताना बोलत होते. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा १२ वा हप्ता त्यांनी आज जारी केला. यावेळी थेट लाभ हस्तांतरण योजने अंतर्गत १६ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आली. देशातल्या शेतकऱ्यांचं जीवन सुलभ करण्याचे सरकारचे प्रयत्न असून त्यांचं उत्पन्न वाढवण्यावर भर दिला जाईल असं ते यावेळी म्हणाले. शेतकरी, कृषी क्षेत्रातले स्टार्टअप्स आणि लाभधारक आज एकाच मंचावर एकत्र आल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. देशातले कृषी स्टार्टअप्स शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी आणि मातीचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत करत असून, कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी वापरासाठी सोपं तंत्रज्ञान उपलब्ध करत आहेत असं ते म्हणाले.यावेळी प्रधानमंत्र्यांनी रसायनं आणि खंत मंत्रालयाच्या सहा हजार प्रधान मंत्री किसान समृद्धी केंद्रांचं उदघाटन केलं. या केंद्रांद्वारे देशभरातली खतांची किरकोळ दुकानं प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांमध्ये टप्प्या टप्प्यानं परिवर्तित केली जातील. या केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ खत उपलब्ध होणार नाही, तर बीज, शेतीची उपकरणं, मृदा परीक्षण, यासारखी सर्व प्रकारची माहिती उपलब्ध होईल, अशी माहिती प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिली. देशातली ३ लाख ३० हजार खतांची किरकोळ दुकानं या योजनेमध्ये समाविष्ट केली जाणार असल्याचं ते म्हणाले.