नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज ॲडलेड  इथं झालेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशावर पाच धावांनी विजय मिळवला. बांगलादेशानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. के.एल. राहुलनं ३२ चेंडूत ५० धावा तर विराट कोहलीनं ४४ चेंडूत केलेल्या नाबाद ६४ धावांच्या खेळीमुळे भारताला  निर्धारीत २० षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात १८४ धावा करता आल्या. त्यात सूर्यकुमार यादवनं ३० धावांचं मोलाचं योगदान दिलं. बांगलादेशातर्फे हसन मेहमूदनं ३ तर शकील अल हसननं २ गडी बाद केले. पावसाचा व्यत्यय आल्यामुळे बांगलादेशाला विजयासाठी १६ षटकात १५१ धावांचं लक्ष्य देण्यात आलं. मात्र त्यांना ६ गडी गमावून १४५ धावाच करता आल्या. लिटन दासनं २७ चेंडूत केलेली ६० धावांची झुंजार खेळी इतरांची साथ न मिळाल्यानं संघाला विजयापर्यंत नेऊ शकली नाही. भारतातर्फे अर्शदीप सिंग आणि हार्दीक पांड्यानं प्रत्येकी दोन, तर महम्मद शमीनं एक बळी मिळवला.