नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेततर्फे परदेशी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या एका पाठयवृत्तीला सुधाकर राजे यांचं नाव दिलं जाणार आहे. बडोदा, दिल्ली आणि मुंबईत पत्रकारिता आणि स्तंभलेखन करणाऱ्या तसंच संदर्भकार आणि संशोधक म्हणून काम करणाऱ्या सुधाकर राजे यांचं नुकतंच वार्धक्यानं निधन झालं. त्या निमित्त काल मुंबईत आयोजित श्रद्धांजली सभेत भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी ही माहिती दिली. वाचन आणि मूलभूत चिंतन, याचं लेखक म्हणून नेमक्या शब्दात प्रकटीकरण करणारे सुधाकर राजे यांनी एक आदर्श प्रस्थापित केला आहे, असंही सहस्त्रबुद्धे म्हणाले. सुधाकर राजे यांच्या साहित्य संपदेचा प्रसार करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, असं  आश्वासनही त्यांनी दिलं.