मुंबई : “माजी सैनिकांचे देशाच्या सुरक्षेसाठीचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी प्राथमिक शाळांमध्ये शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षकपदी नेमणूक करावी. पात्र माजी सैनिकांना एक वर्षाचे क्रीडा आणि शारीरिक शिक्षणाचे विशेष प्रशिक्षण द्यावे”, असे निर्देश शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले.
शिक्षण विभागातील माजी सैनिक व शहीद सैनिक कुटुंबियांच्या समस्या व शिक्षक भरतीमध्ये माजी व शहीद सैनिकांच्या कुटुंबियांच्या मागण्यांबाबत आज जवाहरलाल बालभवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री केसरकर बोलत होते.
मंत्री केसरकर म्हणाले की, माजी सैनिकांचे सैन्यातील कामाचे स्वरूप पाहता; ते शारीरिक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना उत्तम प्रशिक्षण देऊ शकतील. त्यांच्यासाठी असलेल्या आरक्षणांतर्गत पात्र सैनिकांना शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक पदी सामावून घेण्याची प्रक्रिया राबवावी. शासकीय सैनिकी शाळेप्रमाणे खाजगी सैनिक शाळेतही अभ्यासक्रम व प्रशासकीय व्यवस्था कार्यरत असावी यासाठी सैनिक स्कूल समितीमध्ये फेरबदल करून शासकीय अधिका-यांचा समावेश असलेली समिती त्वरीत गठीत करावी.
सैनिक फेडरेशन व सैनिक समन्वय समितीने मागणी केल्याप्रमाणे शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता चाचणी (टीएआयटी) परिक्षेसाठी स्वतंत्र गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार असल्याचेही मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
या बैठकीस शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजीतसिंह देओल, शिक्षण आयुक्त शिवाजी मांढरे, सैनिक फेडरेशन व सैनिक समन्वय समितीचे अध्यक्ष, माजी खासदार व आमदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत, सैनिक फेडरेशन व सैनिक समन्वय समितीचे सचिव अमर माने, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाजीराव देशमुख, पुनर्नियुक्त माजी सैनिक तथा उपार्ध्यक्ष उमाकांत भूजबळ, समिती सदस्य फ्लेचर पटेल आदी उपस्थित होते.