मुंबई : राज्यात यावर्षीचा दक्षता जनजागृती सप्ताह दि. 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2019 या कालावधीत ‘ईमानदारी- एक जीवनशैली’(इंटेग्रिटी- अ वे ऑफ लाईफ) या संकल्पनेवर आधारित आयोजित करण्यात येणार आहे.
भ्रष्टाचाराविरुद्ध जागृती निर्माण करण्यासाठी राज्यात सन 2000 पासून दरवर्षी दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित केला जातो. भ्रष्टाचार निर्मुलन, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा तसेच भ्रष्टाचाराचे गंभीर परिणाम आणि धोके याविषयी परिणामकारक जनजागृतीचे माध्यम म्हणून केंद्रीय दक्षता आयोग (सीव्हीसी) जनजागृती सप्ताहाकडे विशेष लक्ष केंद्रित करते. यावर्षी आयोगाने ‘इंटेग्रिटी- अ वे ऑफ लाईफ’ या संकल्पनेनुसार जनजागृतीवर भर देण्याचे निश्चित केले आहे.
राज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख, राज्य शासनाचे अंगीकृत उपक्रम, सहकारी संस्था व स्वायत्त संस्थांमार्फत सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. दिनांक 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा. भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेऊन कार्यक्रमाचा प्रारंभ होईल. त्यानंतर राज्यपालांचा संदेश उपस्थितांना वाचून दाखविण्यात येणार असून हा संदेश राज्यातील जनतेसाठी प्रसूत करण्यात येईल.
या सप्ताहाच्या निमित्ताने राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार कार्यालयाच्या दर्शनी भागात व मोक्याच्या ठिकाणी भित्तीपत्रक, कापडी फलक लावण्यात येणार आहेत. कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्ये भ्रष्टाचाराच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकण्यासाठी चर्चासत्रे, वादविवाद स्पर्धा, व्याख्याने, निबंधस्पर्धा, कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. यानिमित्ताने विशेष पुस्तिकांचे प्रकाशन करणे तसेच केंद्रीय दक्षता आयोगाच्या http://www.cvc.nic.in या संकेतस्थळावरील जनजागृती साहित्याचे जनतेमध्ये वितरण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यातील अशासकीय संघटना, स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांनी दक्षता जनजागृती मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागामार्फत करण्यात आले आहे.