नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत – प्रशांत क्षेत्रात चीनच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे ऑस्ट्रेलियामध्ये सैन्याची अतिरिक्त कुमक वाढवण्याचा निर्णय अमेरिकेनं घेतला. ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील भागात अमेरिकेची जास्तीत जास्त विमानं या धावपट्टीवर उतरू शकतील, म्हणून विमानाच्या धावपट्टीचा विकास करण्याचा निर्णय अमेरिकेनं घेतला असल्याची माहिती अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टीन यांनी दिली.
अमेरिकेची बी-52 ही बॉम्ब टाकणारी विमानं देखील सहज उतरू शकतील, अशा पद्धतीनं या धावपट्टीचा विकास केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ऑस्ट्रलियाचे उपप्रधानमंत्री आणि संरक्षणमंत्री रिचर्ड मार्ल्स आणि परराष्ट्रमंत्री पेनी वाँग आणि अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टीन आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री एँटनी ब्लिंकन यांच्यात वॉशिंग्टन इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या क्षेत्रात अमेरिका आपल्या तीनही दलांची कुमक हळुहळु वाढवणार असल्याचं ऑस्टीन यांनी सांगितलं. तसंच अमेरिका ऑस्ट्रेलियाला परमाणूसज्ज पानबुडी देखील देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.