पिंपरी गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत २०२१-२२ मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नेहरुनगर दवाखान्याची राज्य शासनाच्या प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाकरीता निवड झाली आहे. भोसरी रुग्णालय द्वितीय तर आकुर्डी रुग्णालयाने तृतीय क्रमांक प्राप्त केला असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली.

राज्य शासनाच्या वतीने महानगरपालिका अंतर्गत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत ठराविक कार्यप्रणालीचा दर्जा ठरविणे त्यानुसार गुणवत्ता तपासणी करणे व सेवांची गुणवत्ता सुधारणे या गोष्टींचा यात समावेश करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत देशभरातील विविध सरकारी रुग्णालये, दवाखाने यांचे जिल्हा, राज्य तसेच  देशस्तरावर मुल्यांकन केले जाते.

वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील विविध सरकारी रुग्णालये तसेच दवाखान्यांची जिल्हा, राज्य व देशस्तरावर मुल्यांकन केले आहे. त्यामधुन ही निवड करण्यात आली आहे. नेहरुनगर दवाखान्याची राज्य शासनाच्या प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाकरीता निवड झाली आहे. भोसरी रुग्णालय द्वितीय तर आकुर्डी रुग्णालयाने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. महापालिकेच्या थेरगाव रुग्णालय, जिजामाता रुग्णालय आणि तालेरा रुग्णालयाने देखील   प्रोत्साहनपर पारितोषिक मिळवले आहे.

महापालिकेच्या आरोग्य वैद्यकिय अधिकारी तथा वैद्यकिय संचालक डॉ. पवन साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील तसेच रुग्णालयांतील अधिकारी व कर्मचारी यांनी या मानांकनासाठी योगदान देऊन महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यामध्ये ज्येष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, डॉ.छाया शिंदे, डॉ. ऋतुजा लोखंडे, डॉ. बाळासाहेब होडगर, डॉ. अभयचंद्र दादेवार, डॉ. सुनिता साळवे, डॉ. संगिता ‍तिरुमणी, वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना गडलिंगकर, डॉ. चैताली इंगळे यांचा समावेश आहे.