पिंपरी : महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पवनाथडी जत्रेचे उद्घाटन दि. १६डिसेंबर २०२२ रोजी  सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

दि.१६ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२२ या कालावधीत सांगवी येथील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर महापालिकेच्या वतीने  पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे.  आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या उद्घाटन कार्यक्रमासाठी खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, डॉ.अमोल कोल्हे , आमदार उमा खापरे, लक्षण जगताप , संग्राम थोपटे, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

पवनाथडी जत्रेच्या निमित्ताने महापालिकेच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १६ डिसेंबर सायंकाळी ६ ते १० या वेळेत “मी राजसा तुम्हासाठी” हा बहारदार मराठी गीत आणि लावण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  दि. १७ डिसेंबर सायंकाळी ६ ते १० या वेळेत मराठमोळी संस्कृती जतन करणारा “मायबोली महाराष्ट्राची” हा कार्यक्रम होणार आहे. तसेच दि. १८ डिसेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता “पवनाथडी महिला शक्ती” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यामध्ये आंतरराष्ट्रीय मेकअप आर्टिस्ट शेफाली कुमावत यांचे “महाराष्ट्रीयन ब्रीड विथ ब्राझिलियन टच” या विषयावर महिलांसाठी प्रत्यक्ष शिकवणी व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजता महिलांसाठी खास  खेळ पैठणीचा- न्यु होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.   तसेच दि. १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पंचमदा यांच्या सदाबहार गाण्यांचा आर डी एक्स हा कार्यक्रम होणार आहे, दि. २० डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता “लाखात देखणी” हा लावण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे यांनी दिली.

महिला बचत गट आणि वैयक्तिक महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, महिलांमध्ये विपणन व विक्री कौशल्य विकसित व्हावे यासाठी पवनाथडी जत्रा भरवण्यात येते.  यामध्ये महिला बचत गटांसाठी विक्री प्रदर्शनासाठी स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात येतात.  पवनाथडी जत्रेस  जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देऊन जत्रेचा आनंद घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.