नवी दिल्ली : 11 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 नोव्हेंबरला ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेयर मेसियस बोल्सोनोरो यांची भेट घेतली.

2020 च्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून येण्याकरता पंतप्रधानांनी ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांना आमंत्रित केले. ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी या निमंत्रणाचा सहर्ष स्वीकार केला.

धोरणात्मक भागीदारी वृद्धींगत करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी यावेळी मान्यता दर्शवली. व्यापारविषयक मुद्यांवर चर्चा करण्यासाठी आपण उत्सूक असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. कृषी अवजारे, पशुपालन, जैव इंधन यासह ब्राझीलकडून संभाव्य गुंतवणुकीच्या इतर क्षेत्रांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला.

ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी यासंदर्भात तयारी दर्शवत आपल्या भारत भेटीदरम्यान आपल्यासमवेत मोठे व्यापारी प्रतिनिधीमंडळही राहील असे सांगितले. अंतराळ आणि संरक्षण क्षेत्रासह इतर क्षेत्रातल्या सहकार्याबाबतही उभय नेत्यांनी चर्चा केली. भारतीय नागरिकांना व्हिसा मुक्त पर्यटनासाठी परवानगी देण्याच्या ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांच्या निर्णयाचे पंतप्रधानांनी स्वागत केले.