पुणे : राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचे पुणे विभागाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी समन्वय ठेवून नियोजनबद्ध काम करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केल्या.

३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम नियोजन आढावा बैठक कौन्सिल हॉल येथे विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली, यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला पुणे व कोल्हापूर विभागाचे मुख्य वनसंरक्षक अनुक्रमे विवेक खांडेकर व क्लेमेंट बेन, पुणे ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, रोजगार हमी योजनेचे उपायुक्त अजित पवार, अधीक्षक कृषी अधिकारी विनय आवटे, उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी आदी उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागाचे ५ कोटी १ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी गतीने काम पूर्ण करावे. जमिनीची माहिती, प्रत्यक्ष खोदण्यात आलेल्या खड्ड्यांची माहिती वेळेत सादर करावी. वृक्ष लागवडीबाबतची माहिती पुस्तिका वेळेत तयार करावी, असे त्यांनी सांगितले. यावेळी विभागनिहाय खोदलेल्या खड्ड्यांची संख्या, रोपांची लागवड, हरित सेना नोंदणी आदी बाबींचा आढावा डॉ. म्हैसेकर यांनी घेतला.

बैठकीला पुणे विभागातील वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, जिल्हा परिषद, कृषी विभाग, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम, शालेय शिक्षण, जलसंपदा, सहकार, उद्योग, रेशीम, महिला व बालविकास आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.