मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या निवासी डॉक्टरांची संघटना मार्ड ने विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप काल मागे घेतला आहे.  निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यांविषयी सरकार सकारात्मक असून येत्या दोन तीन दिवसात संबंधितांची बैठक घेण्याचं आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्यावर संघटनेनं संप मागे घेतला असल्याची माहिती महाजन यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत डॉक्टरांच्या मागण्यांविषयी चर्चा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यात सकारात्मक निर्णय होईल. त्याचबरोबर येत्या दोन दिवसांत १ हजार ४३२ पदं भरली जातील. डॉक्टरांची विविध प्रकारची देणी लवकरात लवकर अदा केली जातील असे विविध निर्णय यावेळी घेण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितलं. निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपामुळे राजधानी मुंबईसह राज्यात विविध ठिकाणच्या रुग्णालयांच्या कामकाजावर काल परिणाम दिसून आला.