नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डिजिटल तंत्रज्ञानामुळे सरकारला देशाच्या अतिदुर्गम भागात केवळ एका बटणाच्या सहाय्यानं पोहोचणं साध्य झाल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं आहे. त्या आज नवी दिल्लीत डिजिटल भारत  पुरस्कार 2022 च्या वितरण समारंभानंतर बोलत होत्या. समाजातल्या असुरक्षित आणि दुर्लक्षित घटकांचा समावेश मुख्य प्रवाहात करत, भारत एक उत्तम उदाहरण आखून देत असल्याचा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला. सरकारनं डिजिटल भारत कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाचं परिवर्तन डिजिटल समाज आणि ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेत करण्याचा दृष्टिकोन आखला आहे. सरकारकडून सर्व स्तरावर दिली जाणारी माहिती आणि पुरवल्या जाणाऱ्या सेवा एक खिडकी योजनेद्वारे भारतीय राष्ट्रीय पोर्टलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल भारत पुरस्कार प्रदान केले जातात. नागरिकांचं डिजिटल सक्षमीकरण या प्रवर्गात ई-नाम सेवेला प्लॅटिनम, ई-ट्रान्सपोर्ट सेवेला सुवर्ण तर न्यायनिवाडा पोर्टलला रौप्य पुरस्कार मिळाला आहे. सामाजिक आर्थिक विकासासाठी डेटा शेअरिंगचा वापर प्रवर्गात गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय अंतर्गत स्मार्ट सिटीज मिशनला प्लॅटिनम, सीबीएसईला सुवर्ण तर कर्नाटकच्या ई- गव्हर्नन्स केंद्राला रौप्य पुरस्कार मिळाला आहे. स्टार्ट-अपच्या सहयोगाने डिजिटल पुढाकार प्रवर्गात केरळच्या डिजिटल कार्यबल  व्यवस्थापन प्रणालीला प्लॅटिनम, तेलंगणच्या मृदा पोषण व्यवस्थापनाला सुवर्ण तर उत्तराखंडच्या डिजिटल ठेव परतावा प्रणालीला रौप्य पुरस्कार प्राप्त झाला आहे.