मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेत उपसभापती आणि विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांचं नाव नसल्यानं विरोधकांनी आज विधानपरिषदेत गदारोळ केला. त्यामुळे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कामकाज बारा वाजेपर्यंत तहकूब केलं होतं.काँग्रेसचे भाई जगताप यांनी हा विषय उपस्थित केला आणि वरिष्ठ सभागृहाची दखलही घेण्यात आलेली नाही, असं सांगत याचा निषेध केला. हे सर्वोच्च सभागृह आहे इथल्या सदस्यांचा, सभापतींचा मान राखला पाहिजे याबद्दल सभागृहाचं एकमत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दोन्ही विरोधी पक्षांची एक बैठक घेऊन तोडगा काढावा, अशी मागणी भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी यावेळी केली. यासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या निवेदनानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं उपसभापतींना कामकाज पाऊण तास तहकूब करावं लागलं.
नियमित कामकाज सुरू होताच यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभापतींचा अवमान व्हावा अशी कृती राज्य सरकारकडून होणार नाही. तसा सरकारचा मानसंही नाही असं स्पष्ट केलं. राजशिष्टाचारासंदर्भात काही त्रुटी असतील तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून यात काही बदल करायचे असतील तर कार्यवाही करण्यात येईल असं फडणवीस यांनी सांगितलं. ही कार्यक्रम पत्रिका राजशिष्टाचाराप्रमाणेच छापली असून सभापतींचा कोणताही अवमान व्हावा अशी सरकारची भूमिका नाही, असं सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही स्पष्ट केलं. या कार्यक्रमाला उपसभापतींनी अवश्य यावं अशी विनंती मुनगंटीवार यांनी केली. यावर बोलताना उपसभापती नीलम गोर्हे यांनी मागच्या काळातही असं घडलं असून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळातही कार्यक्रम पत्रिकांमध्ये नाव नसायची याकडे त्यांनी लक्ष वेधलं.