मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात शिवसेना समसमान सत्तेची मागणी करत आहे. भाजपाला जनतेनं जनादेश दिला आहे. भाजपा जास्त जागा जिंकून पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे, असं प्रतिपादन भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या दिवाळी संमेलनात केलं.
भाजपाच्या नेत्तृत्वाखालील युती राज्याला स्थिर सरकार देईल, दिवाळी नंतर सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू होईल, असंही ते म्हणले. नवनिर्वाचित आमदारांची येत्या बुधवारी बैठक होणार आहे, आणि त्या बैठकीत विधिमंडळ नेत्याची निवड करण्यात येईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.
बुधवारीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक होत असून शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत विरोधी पक्षनेत्याची निवड होणार आहे. शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची काल मातोश्री इथं बैठक झाली.
या बैठकीत सत्तेच्या सामान वाटपाचं लेखी आश्वासन दिल्यानंतरच भाजपा बरोबर सरकार स्थापनेसंदर्भात बैठक होईल, असा निर्णय शिवसेना अध्यक्ष, उद्धव ठाकरेंनी घेतल्याची माहिती सेना नेते प्रताप सरनाईक यांनी दिली.