नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात गज उत्सव- 2023 चं उद्घाटन केलं. हत्ती भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी आहे. म्हणून, आपला राष्ट्रीय वारसा जतन करण्यासाठी हत्तींचे संरक्षण करणे हा आपल्या राष्ट्रीय जबाबदारीचा एक महत्त्वाचा भाग आहे, असं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.आसामचे काझीरंगा आणि मानस राष्ट्रीय उद्यान ही केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगासाठी अमूल्य वारसा स्थानं आहेत. प्रोजेक्ट एलिफंट आणि गज-उत्सव यशस्वी होण्यासाठी सर्व संबंधितांना एकत्रितपणे पुढे जावं लागेल यावर त्यांनी भर दिला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू, राज्यपाल गुलाब चंद कटारिया, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि इतर मान्यवर या समारंभाला उपस्थित होते.