मुंबई : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ राबवित असलेल्या पन्नास टक्के अनुदान योजना व बीज भांडवल योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन महामंडळाच्या मुंबई शहर/उपनगर जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
जिल्हा कार्यालय मुंबई व उपनगर अंतर्गत २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ५० टक्के अनुदान व बीज भांडवल या दोन्ही योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविण्यात येतात. सदर योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव सादर करणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध नागरिकांनी यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
१८ वर्षांवरील व वार्षिक उत्पन्न ३ लाखापर्यंत असलेले नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतात. ५० टक्के अनुदान योजनेअंतर्गत, प्रकल्प मर्यादा ५० हजारापर्यंत असणे गरजेचे आहे. प्रकल्प मर्यादेच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १० हजार पर्यंत अनुदान देण्यात येते व उर्वरीत रक्कम बँकेमार्फत देण्यात येते.
तसेच, बीज भांडवल योजनेअंतर्गत प्रकल्प मर्यादा ५० हजार ते ५ लाखापर्यंत असणे गरजेचे आहे. प्रकल्प मर्यादेच्या २० टक्के बीज भांडवल कर्ज महामंडळामार्फत ४ टक्के दर साल दर शेकडा व्याजदराने देण्यात येते. तर, बँकेचे कर्ज ७५ टक्के देण्यात येते व नियमाप्रमाणे व्याजदर आकारण्यात येते. महामंडळाचे व बँकेच्या कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हफ्त्यानुसार ३ ते ५ वर्षाच्या आत करावी लागते. अर्जदारास ५ टक्के स्वत:चा सहभाग भरणे गरजेचे असणार आहे.
इच्छुकांनी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित गृहनिर्माण भवन, कलानगर, मुंबई उपनगर, वांद्रे (पूर्व), मुंबई -५१ या ठिकाणी अर्ज सादर करावेत.