मुंबई (वृत्तसंस्था) : काल महाराष्ट्र दिनी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली. दोन दिवसांपूर्वी तीन नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आलं, त्या नजीक असलेल्या दामरंचा आणि थेट छत्तीसगडच्या सीमेवर जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांशी संवाद साधला. दामरंचा तसचं  ग्यारापत्ती इथल्या पोलिस इमारतींचं, तसंचं अनेक प्रकल्पांचं त्यांनी यावेळी उद्घाटन केलं.

नक्षलवाद ही विचारांची नाही, तर ती देशविरोधी, लोकशाही आणि संविधान न मानणार्‍यांची ती लढाई आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. इतर परकीय शक्ती आणि आयएसआयसारख्यांची मदत या नक्षलवाद्यांना असल्याचं ही ते म्हणाले .

या नक्षल कारवायांमध्ये सामान्य माणसं,आदिवासी, अनुसूचित जातीच्या लोकांचे बळी गेले असून लोकहित, व्यापक विकासाला नक्षल विचारधारेनं कायम विरोध केला आहे. त्यामुळेच एकिकडे या समस्येविरोधात लढणार्‍या जवानांचं मनोबल उंचावण्यासाठी तर दुसरीकडे जनतेशी संवाद साधण्यासाठीच आपण  इथं आलो आहोत असं त्यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की, जेव्हा स्थानिक स्तरावर नक्षलवाद्यांना यश मिळत नाही, तेव्हा ते लोकांचे ब्रेनवॉश करुन ही लढाई शहरांमध्ये लढू पाहतात. यामुळे  शहरी नक्षलवादाची समस्या मोठी आहे. पोलिस भरतीला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

विकासाबाबत बोलतांना फडणवीस म्हणाले की गडचिरोलीत कनेक्टिव्हीटी वाढविण्याचे काम मोठ्या प्रमाणात होत असून सुरजागडच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक होत असल्याचं त्यांनी सांगितलं. गडचिरोलीत थांबणारा मी पहिलाच मुख्यमंत्री होतो, असेही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले. त्यांनी स्थानिकांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं.

गडचिरोली इथं देवेंद्र फडणवीस यांनी शहीद स्मारकाला अभिवादन केलं. पोलिस अधीक्षक कार्यालयातील एकलव्य सभागृहात त्यांनी सी-६० च्या जवानांचा सत्कार केला आणि नूतन सभागृहाचे सुद्धा उदघाटन केलं. दादालोरा खिडकी या नावाने एक योजना गडचिरोली पोलिस राबवित असून, शासकीय योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम गडचिरोली पोलिस करीत आहेत. यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप आढावा बैठक घेतली.