मुंबई : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त येत्या गुरुवारी (31 ऑक्टोबर २०१९) राज्यात जिल्हा मुख्यालये, महत्त्वाची शहरे आदी विविध ठिकाणी एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. हा दिवस देशभरात ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन करण्यात येते. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये व तद्नंतर अखंड भारताच्या निर्मितीसाठी दिलेल्या मौलिक योगदानाचा गौरव व्हावा व जनतेला त्यांची कामगिरी प्रेरणादायी ठरावी यादृष्टीने त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने आयोजित दौडद्वारे एकतेचा संदेश देण्यात येणार आहे. दौडमध्ये क्रीडा संघटना, शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहेत.
नाशिक विभागातील धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर आणि नाशिक अशा पाचही जिल्ह्यात राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने एकतेचा संदेश देण्यासाठी प्रशासनाच्यावतीने ‘एकता दौड’चे आयोजन करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यात हुतात्मा उद्यान येथून सकाळी 7.30 वाजता दौडचा शुभारंभ होणार आहे. 21 क्रीडा संघटनांनी या दौडमध्ये सहभाग घेतला आहे. अहमदनगर येथे सकाळी 8 वाजता जिल्हा क्रीडा संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून दौडला सुरूवात होईल. टिळकरोडमार्गे आयुर्वेद कॉलेज चौक, रुपीबाई बोरा हायस्कूल मार्ग, दिल्ली गेट, सिद्धीबाग मार्गे पोलीस मुख्यालय येथे एकता दौडचा समारोप होईल.
धुळे येथे सकाळी 8 वाजता जमनालाल बजाज मार्गावरील सरदार वल्लभभाई पटेल उद्यान येथून दौडचा प्रारंभ होणार असून महापालिका जुन्या इमारतीमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात दौडचा समारोप होणार आहे. जळगाव येथे देखील एकता दौडचे आयोजन करण्यात येणार आहे. नाशिकमधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथून एकतेची शपथ घेऊन दौडचा शुभारंभ होईल. जिल्हाधिकारी सूरज मांढरे एकतेची शपथ देतील. एमजी रोड, रेडक्रॉस सिग्नल, सीबीएसमार्गे जिल्हा क्रीडा संकुल येथे दौडचा समारोप होणार आहे. एकता दिवसाच्या निमित्ताने देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने 31 ऑक्टोबर रोजी स. 8.00 वा. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी एकता दौड बरोबरच राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात येणार आहे. तसेच पोलिस प्रशासनातर्फे मानवंदना आणि संचलन होणार आहे.
विदर्भात नागपूर येथे ही दौड अमरावती रोड येथील संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर सकाळी 8 वाजता सुरु होणार आहे. अकोला येथे ही दौड जिल्हा क्रीडा संकुल वसंत देसाई स्टेडीयम येथून सकाळी आठ वाजता सुरु होणार आहे. वाशिम येथे जिल्हा क्रीडा संकुल येथून दौड सुरु होणार असून नवीन शासकीय विश्रामगृह, जिल्हाधिकारी कार्यालय, राजस्थान आर्य महाविद्यालय, सामान्य रुग्णालय मार्गे पुन्हा जिल्हा क्रीडा संकुल येथे आल्यानंतर दौडचा समारोप होईल. बुलडाणा येथे ही दौड जिल्हा पोलीस मैदान येथून सुरु होणार असून शहरातील मुख्य चौकांमधून पुन्हा जिल्हा पोलीस मैदान येथे आल्यानंतर दौडचा समारोप होईल. याशिवाय इतरही जिल्ह्यांमध्ये दौड सह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.