नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी अमरनाथ यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. यात्रेकरुंना दर्शन घेण्यात कोणतीही अडचण येऊ नये याला मोदी सरकारचं प्राधान्य असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. अमरनाथ यात्रेच्या मार्गावर पुरेशी सुरक्षाव्यवस्था ठेवण्याचे तसंच विमानतळ आणि रेल्वे स्थानकापासून यात्रेच्या मार्गावर सुरळीत व्यवस्था ठेवण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
यात्रेकरुंच्या सोयीसाठी रात्रीच्या वेळी श्रीनगर आणि जम्मूहून विमानसेवा उपलब्ध करून देण्याचं तसंच ऑक्सिजन सिलिंडरचा पुरेसा साठा, डॉक्टरांचा अतिरिक्त चमू, आपत्कालीन परिस्थितीसाठी पुरेशा प्रमाणात वैद्यकीय खाटांची व्यवस्था आणि रुग्णवाहिका आणि हेलिकॉप्टर तैनात करण्याचे आदेश ही गृहमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. यात्रा मार्गावर चांगली दळणवळण व्यवस्था आणि दरड कोसळल्यास मार्ग त्वरित खुला करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यास त्यांनी सांगितलं. अमरनाथ यात्रा 1 जुलै ते 31 ऑगस्ट अशी 62 दिवस चालणार आहे.