मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात नव्या सरकारच्या स्थापनेवरुन भाजप आणि शिवसेना यांच्यात सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भाजपा आपल्या विधिमंडळ पक्ष नेत्याच्या निवडीसाठी मुंबईत विधानभवनात झालेल्या बैठकीत देवेंद्र फडनवीस यांची पुन्हा एकदा पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली आहे.

केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते नरेंद्र सिंह तोमर आणि पक्षाचे उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना हे केंद्रीय निरीक्षक म्हणून बैठकीला उपस्थित होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, यांनी देवेंद्र फडनवीस यांच्या  नावाचा  विधीमंडळ नेते म्हणून प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सुधीर मुनंगटीवार, हरीभाऊ बागडे, राधाकृष्ण विखे पाटील, यांच्यासह दहा आमदारांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला.

याप्रसंगी रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले, रासपचे महादेव जानकर, पंकजा मुंडे, विनोद तावडे, गिरिश महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, आज आणखी दोन अपक्ष आमदारांनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.

चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार आणि शाहुवाडीचे जनसुराज्य शक्ती पक्षाचे डॉ विनयकुमार कोरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा जाहीर केला. दरम्यान, मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांच्याही आपापल्या विधिमंडळ पक्षाचे गटनेते निवडण्यासाठी बैठका होत आहेत.