नवी दिल्ली : लोकांच्या दैनंदिन जीवनात सेमीकंडक्टरची भूमिका महत्त्वाची आहे आणि सेमीकॉन कार्यक्रमाअंतर्गत सेमीकंडक्टर उत्पादन परिसंस्था तयार करण्यावर केंद्र सरकारचा भर असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज सांगितलं. गुजरातमधल्या गांधीनगर इथं तीन दिवसीय सेमीकॉन इंडिया २०२३ चं उद्घाटन काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. परिषदेच्या आज दुसऱ्या दिवशी चंद्रशेखर वार्ताहरांशी बोलत होते. देशात सेमीकंडक्टर्सच्या क्षेत्रात चीप जुळणी, उत्पादन तसंच संशोधन आणि विकासाला चालना दिली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. बंगळुरूची भारतीय विज्ञान संस्था आणि लाम रिसर्च इंडिया यांच्यात सेमीकंडक्टर फॅब्रिकेशनविषयक अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.
सेमीकंडक्टरच्या संरचना आणि उत्पादनाचं केंद्र म्हणून भारताला जगापुढे प्रदर्शित करण्यासाठी इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत ‘भारताच्या सेमीकंडक्टर परिसंस्थेस चालना’ या संकल्पनेवर, ही परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत २३ हून अधिक देशांतील ८,००० पेक्षा अधिक मान्यवर उपस्थित आहेत. सेमीकॉन इंडिया २०२३ मध्ये मायक्रॉन टेक्नॉलॉजी, अप्लाइड मटेरियल्स, फॉक्सकॉन, कॅडेन्स, एएमडी आणि सेमी सारख्या औद्योगिक संघटना यांच्यासह प्रमुख जागतिक कंपन्यांमधील उद्योगांचे प्रमुख सहभागी झाले आहेत.