मुंबई (वृत्तसंस्था) : नांदेड इथं शासकीय रुग्णालयात झालेल्या प्रकारासंदर्भात हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 रुग्ण दगावल्यानंतर आरोग्य यंत्रणेबाबत संताप व्यक्त करत पाटील यांनी अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांना स्वच्छतागृह साफ करायला लावल्याचा काल व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाला. या घटनेनंतर अनेक सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर संघटना आदींनी पाटील यांचा निषेध केला. याची दखल घेऊन नांदेड ग्रामीण पोलिसांनी खासदार हेमंत पाटील यांच्यावर ॲट्रॉसिटीसह शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.