नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जलद गतीनं हल्ला करण्याची क्षमता असलेल्या ‘आयएनएस तरमुगली’ या युद्धनौकेचा काल विशाखा पट्टणम इथल्या नौदलाच्या तळावर आयोजित समारंभात भारतीय नौदलाच्या ताफ्यात समावेश करण्यात आला. २००६ मध्ये भारतानं हे जहाज मालदीव नौदल संरक्षण दलाला भेट म्हणून दिलं होतं. यंदाच्या मे महिन्यात हे जहाज परतलं होतं. विशाखापट्टणम इथल्या नौदलाच्या गोदीमध्ये नूतनीकरण झाल्यावर आता ते भारतीय नौदलात नव्या रूपात दाखल झालं आहे.
या युद्धनौकेवर प्रगत एमटीयू इंजिन, वॉटर जेट प्रोपल्शन, अत्याधुनिक दळणवळण उपकरणं, तोफा आणि प्रगत रडार यंत्रणा बसवण्यात आली असून, देशाच्या पूर्व किनारपट्टी भागात देखरेख आणि संरक्षणासाठी ते तैनात केलं जाईल.