मुंबई : राज्यातल्या सत्तास्थापनेचा पेच आज चौदाव्या दिवशीही कायम आहे. भाजपा नेत्यांनी मुंबईत राजभवनात राज्यपालांची भेट घेतली. पाच वर्ष सत्तेत असलेल्या महायुतीला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट जनादेश मिळाला. त्या आधारे आतापर्यंत सरकार स्थापन व्हायला हवं होतं. मात्र, यासाठी विलंब लागत असल्यानं कायदेशीर बाबींवर चर्चा करण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली, असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेटीनंतर वार्ताहरांना सांगितलं.
यावेळी सुधीर मुनगंटीवर, गिरीश महाजन आणि आशीष शेलार हे भाजपा नेते उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वार्ताहर परिषद घेतली. महाराष्ट्रात स्थिर सरकार देण्यासाठी भाजपा सर्वतोपरी प्रयत्न करेल, असं त्यांनी सांगितलं. सरकार स्थापनेबाबत भाजपा आणि शिवसेना यांच्यातली चर्चा पूर्णपणे ठप्प असल्याचं वृत्त त्यांनी फेटाळून लावलं.
भाजपा अल्पमतातलं सरकार देणार नाही, स्थिर सरकार देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलली जात आहेत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांमधे चर्चा सुरु आहे, असं ते म्हणाले.