पुणे : जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ रविवारी (३१ डिसेंबर) जुन्नर नगरपरिषद येथून करण्यात आला. जुन्नरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्याधिकारी संदीप भोळे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्धाटन करण्यात आले.
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील १३ नगरपरिषद आणि ४ नगरपंचायतीत ३१ डिसेंबर २०२३ पासून तळागळातील लाभार्थ्यांना चित्रफिती आणि हस्तपत्रकांच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. नागरिकांशी संवाद साधून लाभार्थ्यांची नोंदणीदेखील करून घेण्यात येत आहे.
जुन्नर शहरात झालेल्या कार्यक्रमात सुमारे पाचशे लाभार्थ्यांनी सहभागी होत वेगवेगळ्या योजनांबाबत माहिती घेतली. प्रधानमंत्री आवास योजना (नागरी), दिव्यांग बांधव कल्याण योजना, आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, दीनदयाळ अंत्योदय योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, स्वच्छ भारत अभियान इत्यादी नागरी भागातील योजनांची माहिती यावेळी नागरिक व लाभार्थी यांना देण्यात आली.
विकसित भारत संकल्प यात्रा नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रात १४ जानेवारीपर्यंत सुरू राहणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी यात्रेमध्ये सहभागी होऊन केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपरिषद प्रशासनचे सह आयुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी केले आहे.