पुणे : केंद्र शासनाच्या महात्वाकांक्षी योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत यादृष्टीने मंचर आणि राजगुरूनगर नगरपंचायत कार्यक्षेत्रात ‘विकसित भारत संकल्प’ यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेच्या माध्यमातून नगरपरिषद कार्यक्षेत्रात विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात येत असून प्रत्यक्ष लाभही देण्यात येत आहेत.
मंचर आणि राजगुरूनगर शहरात या संकल्प रथाच्या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. लोकसहभाग हे या संकल्प यात्रेच्या उद्दिष्टांपैकी एक महत्वाचे उद्दिष्ट आहे. शहरातून या कार्यक्रमात सुमारे ५५० लाभार्थी सहभागी झाले. यावेळी लाभार्थ्यांनी विविध शासकीय योजनांबाबत माहिती घेतली.
प्रधानमंत्री आवास योजना (नागरी), दिव्यांग बांधव कल्याण निधी योजना, आयुष्मान भारत कार्ड, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, दीनदयाळ अंत्योदय योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, स्वच्छ भारत अभियान इत्यादी नागरी भागात शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती यावेळी नागरिक व लाभार्थी यांना देण्यात आली.
कार्यक्रमस्थळी भेट दिलेल्या अनेक लाभार्थ्यांनी दिव्यांग कल्याण निधी, आयुष्यमान भारत कार्ड व पीएम स्वनिधी या योजनांकरिता प्रत्यक्ष जागेवर नोंदणी केली. ३ जानेवारी रोजी विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत तळेगाव नगरपरिषद क्षेत्रातील मराठा क्रांती चौक आणि नथुभाई भेगडे शाळा मैदान येथे कार्यक्रम होणार आहेत.
नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रातील विकसित भारत संकल्प यात्रेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.