नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात ईशान्य भारतातल्या NCC अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या ४५ मुलींचा बँड पहिल्यांदाच सहभागी होणार आहे. १३ ते १५ वयोगटातल्या या मुलींचा हा बँड आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय छात्र सेनेच्या २ हजार २७४ विद्यार्थ्यांचं प्रजासत्ताक दिन शिबीर दिल्ली इथं सुरु असून त्यात एकूण ९०७ मुलींचा समावेश असल्याचं, राष्ट्रीय छात्र सेनेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीर पाल सिंह यांनी आज बातमीदारांना सांगितलं.
या शिबिरात सहभागी झालेल्या मुलींमध्ये जम्मू आणि काश्मीर मधल्या १२२ आणि ईशान्य भारतातल्या १७७ मुली सहभागी झाल्या असल्याचंही सिंह यांनी यावेळी स्पष्ट केलं. युवक आदान प्रदान कार्यक्रमांतर्गत २५ मित्र राष्ट्रांमधले काही अधिकारी आणि विद्यार्थीही या शिबिरात सहभागी होणार असल्याचं सिंह यांनी यावेळी सांगितलं.