नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ५० वा इफ्फी, अर्थात भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात पणजी इथं सुरु झाला. या सुवर्णमहोत्सवी इफ्फीसाठी भारतीय आणि जागतिक चित्रपटसृष्टीतल्या अनेक तारे-तारकांनी हजेरी लावली. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या महोत्सवाचं उद्धाटन केलं.
चित्रपट उद्योगाच्या विविध गरजांसाठी सरकारनं एकखिडकी पद्धत सुरु केली आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं. दृष्टी बाधितांसाठी अधिक चित्रपट काढावे असं आवाहन जावडेकर यांनी निर्मात्यांना केलं. या झगमगत्या सोहळ्यात सुपरस्टार रजनीकांत यांना ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत सुवर्ण महोत्सव विशेष गौरव पुरस्कार जावडेकर यांनी प्रदान केला.
प्रसिद्ध फ्रेंच चित्रपट अभिनेत्री इजाबेल हुपर्त यांना यावेळी जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.