मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन्ही पक्षांनी दिले असून, लवकरच राज्यातला सरकार स्थापनेचा पेच सुटेल असं दिसतं. राजकीय अनिश्चितता संपून लवकरच राज्यात स्थिर सरकार स्थापन होईल, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन्ही पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन करता येणार नाही, असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शिवसेनेशी आघाडी करण्याची गरज स्पष्ट केली आहे. दरम्यान तीन्ही पक्ष एकत्र येतील, असं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस स्पष्ट केलं असल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं.
समान किमान कार्यक्रम घेऊन सरकार स्थापन करण्यात आता आणखी उशीर होणार नाही, असं ते म्हणाले. राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.