पुणे : जुलै-ऑगस्ट 2019 कालावधीत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी एक हेक्टरपर्यंत घेतलेले पीक कर्ज माफ करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. यासंबंधीच्या जिल्ह्यातील सर्व बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, तालुका उप सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयास कर्जमाफी मागणी प्रस्ताव तयार करण्यासाठी उपलब्ध करून दिल्या असल्याचे जिल्हा उपनिबंधक डॉ. अशोक कुंभार यांनी कळविले आहे.

शेतकऱ्यांकडील बाधीत झालेल्या पिकांचा पंचनामा जिल्हा महसुल यंत्रणेमार्फत करण्यात आला असून शासनाच्या मदत व पुनवर्सन विभागाने  ठरविलेल्या निकषांप्रमाणे तयार करण्यात आलेल्या बाधीत शेतकऱ्यांच्या याद्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांचे अधिनस्त तहसिलदार यांचेमार्फत सहायक निबंधक, सहकारी संस्था यांना प्राप्त झाल्या असून सदरच्या याद्या जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे ग्रामीण या कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत.

सदर याद्या जिल्ह्यातील सर्व बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था तसेच तालुका उपसहायक निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयास कर्जमाफी मागणी प्रस्ताव तयार करण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे ग्रामीण यांनी पत्रकान्वये कळविले आहे.