नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यपाल आणि उपराज्यपालांची दोन दिवसीय परिषद आजपासून नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवन इथं सुरू होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद भरणार आहे. राष्ट्रपती कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली  राष्ट्रपती भवन इथं आयोजित करण्यात आलेली ही तिसरी परिषद असून या परिषदेत विविध सत्रांमध्ये आदिवासींच्या समस्या, शेती व्यवसायातील सुधारणा, जल जीवन मिशन, उच्च शिक्षणाबाबतचे धोरण आणि जीवन सुसह्य करण्यासाठी प्रशासन अशा महत्वपुर्ण विषयांवर चर्चा होणार आहे.

उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर, न्यायमंत्री रविशंकर प्रसाद, मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक, आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा आणि जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत परिषदेला उपस्थित राहाणार आहे. निती आयोगाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच विविध मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारीदेखील परिषदेत सहभागी होणार आहेत.