मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या धक्कादायक राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपा सरकारला पाठिंबा नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.  अजित पवार यांच्यावरील कारवाईचा निर्णय पक्षाच्या बैठकीत घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं.

शरद पवार आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वीच मुंबईत तातडीची वार्ताहर परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.  अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची दिशाभूल केली. भाजपाला पाठिंबा दिला असल्याचं दाखवण्यासाठी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना राज्यपालांकडे नेण्यात आलं.

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या सह्यांची यादी तयार केली होती. हीच यादी अजित पवार यांनी राज्यपालांना सादर केली असावी, त्यामुळे राज्यपालांची फसवणूक झाली असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष एकत्रच आहेत.  यापुढच्या काळात कोणतीही संकटं आली तरी त्याला आम्ही तोंड देऊ आणि यापुढच्या काळातही सरकार आम्हीच बनवू असा दावा त्यांनी केला. आपल्याला चुकीची माहिती देऊन राजभवनात नेण्यात आल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन आमदारांनी या वार्ताहर परिषदेत सांगितलं.

दरम्यान, वार्ताहर परिषदेपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. उद्धव ठाकरे यांनी आपली प्रत्येक राजकीय भूमिका उघड असते असं सांगत लपूनछपून फोडाफोडीचं राजकारण आपण करत नाही, अशा शब्दात भाजपावर जोरदार टीका केली.