नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : थायलंडमध्ये बँकॉक इथं झालेल्या 21 व्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं आज एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं पटकावली. मिश्र दुहेरीच्या कंपाउंड प्रकारात अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा वेन्नम या जोडीनं यी चेन-ची चेन या जोडीचा आज अंतिम फेरीत 158-151 असा पराभव केला.
पुरुषांच्या सांघिक कंपाउंड प्रकारात मात्र भारताच्या अभिषेक वर्मा रजत चौहान आणि मोहन भारद्वाज या अग्रमानांकित त्रिकुटाला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. दक्षिण कोरियाच्या संघानं त्यांचा 233-232 अशा एका गुणानं निसटता पराभव केला.
महिलांच्या सांघिक कंपाऊंड प्रकारातही दक्षिण कोरियाच्या संघाकडून 231-215 असा पराभव झाल्यामुळे, ज्योती- मुस्कान किरार-प्रिया गुर्जर या भारतीय त्रिकुटाला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. भारतानं या स्पर्धेत एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य अशी एकूण सात पदकांची कमाई केली.