प्रकल्पाची उर्वरित कामे वेळेत पूर्ण करावी – सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे

वाहतूक पर्यवेक्षणासाठी बुद्धिमान महामार्ग व्यवस्थापन प्रणाली

अमरावती : समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार असून, हे काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदूर रेल्वे तालुक्यातील किरजवळा येथे दिले.

जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील किरजवळा गावाजवळून जाणाऱ्या समृध्दी महामार्गाच्या कामांची पाहणी श्री. शिंदे यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. समृद्धी महामार्गाचे प्रकल्प व्यवस्थापक राधेश्याम मोपलवार, अधीक्षक अभियंता श्रीमती संगीता जयस्वाल, कार्यकारी अभियंता एस. बी. झोडपे, उपविभागीय अधिकारी अभिजीत नाईक, उपअभियंता अनिल ढेरे यांच्यासह विविध अभियंता अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी श्री. शिंदे यांनी किरजवळा गावाजवळून जाणाऱ्या समृध्दी महामार्गाचे कामांची पाहणी केली व रस्तेनिर्मितीच्या पॅकेज क्रमांक तीनच्या सद्य:स्थितीबद्दल जाणून घेतले. प्रत्यक्ष समृध्दी महामार्गावर उभारण्यात येत असलेल्या गावालगतचा अंडरपास, माती भरावाचे काम, बांधकामांची संरचना आदींची माहिती घेतली व ही कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाची लांबी ७०१ कि. मी. असून, जिल्ह्यात लांबी सुमारे ७३.३७ कि. मी. आहे. रस्त्याची रुंदी १२० मीटर असेल. धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर या तीन तालुक्यातील ४६ गावांतून हा रस्ता जात आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील आष्टा गावापासून सुरुवात होऊन नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाढोणा रामनाथ येथपर्यंत जिल्ह्यातील रस्ता आहे. जिल्ह्यात महामार्गासाठी जमिनीचे भूसंपादन जवळपास पूर्ण झाले आहे.

पॅकेज तीन अंतर्गत ४ मोठे पूल, ६७ छोटे पूल, वाहनांसाठी भुयारी मार्ग २७, पादचारी भुयारी मार्ग ३३, हलक्या वाहनांसाठी भुयारी मार्ग ९ व १५४ मोऱ्या निर्माण होत आहेत. माती भरावाचे काम ८९ टक्के पूर्ण झाले आहे.

प्रस्तावित द्रुतगती महामार्ग हा मोठ्या प्रमाणावर अत्यल्प प्रतिव्यक्ती उत्पन्न क्षेत्रातून जातो. या महामार्गामुळे वऱ्हाडात उत्तम संपर्क रस्त्यांचे जाळे निर्माण होऊन त्यामुळे लहान व मध्यम उद्योजकांच्या व्यवसाय संधी वाढतील. वाशिम-कारंजा येथे फळ निर्यात केंद्र प्रस्तावित असून, द्रुतगती महामार्गाद्वारे वखारी, शीतगृहे यांची साखळी निर्माण होण्यास गती मिळेल. यामुळे आंतरदेशीय व आंतरराष्ट्रीय निर्यातीसाठी लागणाऱ्या कृषी उद्योग केंद्रासाठी साठवण पायाभूत सुविधा निर्माण होण्यास मदत होईल.

जिल्ह्यातील आष्टा ते वाढोणा रामनाथ येथील रस्त्याचे काम एनसीसी लिमिटेड या कंपनीकडून पूर्णत्वास जात आहे. २२ जुलै २०२१ ही काम पूर्ण करण्याची मुदत असून, देखभाल कालावधी चार वर्षे आहे. प्रकल्पाची किंमत दोन हजार ८५० कोटी आहे.