नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्राप्तीकर विभागानं यावर्षी २८ नोव्हेंबरपर्यंत सुमारे २ कोटी १० लाख कर परतावा प्रकरणांची हाताळणी केली आहे. गेल्या वर्षी याच काळात ही संख्या एक कोटी ७५ लाख होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परताव्यांमध्ये २० टक्के वाढ झाली आहे. सीबीडीटी अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं ही माहिती दिली आहे.

२८ नोव्हेंबरपर्यंत २०१९-२० या वर्षासाठी एक पूर्णांक ४६ लाख कोटी रुपयांचा परतावा दिला असून गेल्या वर्षी सुमारे एक पूर्णांक १९ लाख कोटी रुपयांचे परतावे दिले होते, असं सीबीडीटीनं सांगितलं. एप्रिल २०१९ ते २८ नोव्हेंबर या काळात केंद्रीय प्रक्रिया केंद्रानं चार कोटी ७० लाख कर परताव्यांची प्रक्रिया पूर्ण केली असून गेल्या वर्षी याच काळात तीन कोटी ९१ लाख परताव्यांची प्रक्रिया पूर्ण झाली होती.