नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कांद्याच्या भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांच्या कांदा साठवणुकीच्या मर्यादेत बदल केला आहे. आता किरकोळ विक्रेत्यांना पाच टनांपर्यंत तर घाऊक विक्रेत्यांना २५ टनांपर्यंतच कांदा साठवता येणार आहे.

खुल्या बाजारात कांद्याची उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे. आयात केलेल्या कांद्यासाठी ही मर्यादा लागू असणार नाही असं केंद्रीय ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान यांनी ट्वीट करून सांगितलं. यापूर्वी किरकोळ विक्रेत्यांना १० तर घाऊक विक्रेत्यांना ५० टन कांदा साठवण्याची परवानगी होती.