नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू –कश्मीरच्या राज्यपालांचे माजी सल्लागार के. विजय कुमार यांची अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालच्या केंद्रीय गृहमंत्रालयाचे वरिष्ठ सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक झाली आहे.
भारतीय पोलीस सेवेतले १९७५ च्या तुकडीतले अधिकारी असलेले विजय कुमार आता जम्मू-कश्मीर हा केंद्रशासित प्रदेश आणि नक्षलग्रस्त राज्यांशी संबंधित महत्त्वाच्या प्रकरणांमधे गृहमंत्रालयाला मार्गदर्शन करतील. विजय कुमार यांची या पदावरची नेमणूक एक वर्षासाठी असेल, असं केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशात म्हटलं आहे.
विजय कुमार यांनी याआधी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक तसंच हैदराबादच्या राष्ट्रीय पोलीस अकादमीचे संचालक म्हणून काम केलं आहे. तामिळनाडू पोलिसांच्या विशेष कृती दलाचे प्रमुख असताना २००४ साली चंदनतस्कर वीरप्पनचा खात्मा करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.