नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अंदमान आणि निकोबार बेटावरचं अबरदीन पोलीस ठाणं देशातलं सर्वात कार्यक्षम पोलीस ठाणं ठरलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं काल देशातल्या सर्वोत्तम दहा पोलीस ठाण्यांची यादी जाहीर केली. या यादीनुसार गुजरातमधलं बालसिनोर पोलीस ठाणं दुसऱ्या तर मध्यप्रदेशातलं बुरहानपूर पोलीस ठाणं तिसऱ्या क्रमांकावर आहे.

अबरदीन पोलीस ठाण्यानं मालमत्ताविषयक तसंच महिला आणि समाजातल्या दुर्बल घटनांशी संबंधित अनेक प्रकरणं प्रभावीपणे हाताळली आहेत.  योग्य निकषांच्या आधारे, देशातल्या पोलीस ठाण्यांच्या कामगिरीचं मूल्यांकन करण्याचे निर्देश, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये २०१५ साली झालेल्या पोलीस महासंचालकांच्या परिषदेला संबोधित करताना दिले होते.

त्यानुसारच थेट निरीक्षण आणि नागरिकांनी दिलेल्या अभिप्रायाच्या आधारे देशभरातल्या १५ हजार ५०० हून अधिक पोलीस ठाण्यांच्या कामगिरीचं मुल्यांकन केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयानं ही यादी काल जाहीर केली.