नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. अत्यंत गंभीर आणि विस्तृत चर्चेनंतर लोकसभेत हे विधेयक मंजूर करण्यात आलं, असं काल रात्री उशीरा केलेल्या ट्विटमध्ये प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.

प्रस्तावित नागरिकत्व सुधारणा कायदा शतकानुशतकांच्या भारतीय एकात्मतेची परंपरा आणि मानवी मूल्यांच्या विश्वासावर आधारित आहे, असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदार आणि विविध पक्षांचे, नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत. या विधेयकाच्या सगळ्या पैलूंसंदर्भात स्पष्टपणे भूमिका मांडल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह यांची प्रशंसा केली आहे.