मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. सरकार अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करत नाही तोपर्यंत कामकाज होऊ देणार नाही, अशी भूमिका विधानसभेतले विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र आता सरकार शेतकऱ्यांचा विश्वासघात करत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत केला. यावेळी भाजप आणि शिवसेना सदस्यांमध्ये धक्काबुक्कीचा प्रकारही घडला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले सभागृहाचं कामकाज आधी अर्ध्या तासासाठी तहकूब आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं.

दरम्यान, राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासनानं 6 हजार 600 कोटी रुपये मंजूर केले आहेत, यांपैकी एकविशशे  कोटी रूपये वितरीत केले आहेत. तर केंद्र सरकारकडे १४ हजार ६०० कोटी रुपयांची मागणी केंद्र केली आहे अशी माहिती अर्थ मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

नगरअध्यक्ष आणि संरपचांची निवडणूक थेट होणार नाही, नगरसेवक आणि सदस्य निवड करणार अशा स्वरुपाचं विधेयकही आज विधानसभेत झालं.

विधान परिषदेतही शेतकऱ्यांना मदतीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. या मुद्यावरून सभागृहात गदारोळ झाल्यानं कामकाज आधी दोन वेळा पंधरा मिनिटांसाठी, आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षावर जोरदार टीका करत परंपरेला कांळीमा फासेल असं वर्तन न करण्याचं आवाहनं केलं.