नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांची ९५ वी जयंती. यानिमित्तानं देशभरातून वाजपेयी यांना आदरांजली वाहिली जात आहे. २५ डिसेंबर १९२४ ला ग्वाल्हेर इथं त्यांचा जन्म झाला. भाजपाचे खंदे नेते आणि निष्णात राजकारणी म्हणून त्यांची कारकिर्द गाजली.
१९९६ ला १३ दिवस, १९९८ ला ११ महिने आणि त्यानंतर १९९९ ते २००४ या असं एकूण तीन वेळा वाजपेयी यांनी भारताचं प्रधानमंत्रीपद भुषवलं होतं. २०१५ साली वाजपेयी यांना भारतरत्न या भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानंही सन्मानित केलं गेलं. भारताच्या अर्थव्यवस्थेची दूरदृष्टीनं केलेली आखणी, पायाभूत सोयीसुविधांचे असंख्य प्रकल्प, राष्ट्रीय महामार्गांचा विकास असा समृद्ध वारसा वाजपेयी देशाला देऊन गेले आहेत.
वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालीच भारतानं १९९८ ला पोखरण इथं दुसऱ्यांदा अणुचाचणी घेतली होती. देशाचे परराष्ट्रमंत्री म्हणून संयुक्त राष्ट्रसंघात हिंदी भाषेत भाषण करणारे ते पहिले व्यक्ती ठरले होते. प्रभावी वक्ते, उत्तम लेखक आणि कवी, निस्वार्थ भावनेचा सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार अशा विविधांगी पैलूंनी त्यांचं व्यक्तिमत्व घडलं होतं. त्यांच्या कविता अनेकांच्या हृदयाला स्पर्ष करून गेल्या.
शिक्षणतज्ञ आणि स्वातंत्र्यसैनिक भारतरत्न पंडीत मदन मोहन मालविया यांचीही आज जयंती असून, देश त्यांना आंदरांजली वाहात आहे.