मुंबई : गृहनिर्माण मंत्री जयंत पाटील यांनी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाला भेट देऊन विविध पुनर्वसन प्रकल्पांची तसेच प्राधिकरणाच्या कामाची माहिती घेतली.
यावेळी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्यावतीने सादरीकरण करण्यात आले. त्यात प्राधिकरण स्थापन करण्यामागची पार्श्वभूमी, झोपडपट्टी विकासाच्या धोरणाची वाटचाल, योजना अंमलबजावणीची प्रक्रिया, झोपडपट्टी पुनर्वसन योजनांचे प्रकार, वैशिष्ट्ये, योजनांची सद्य:स्थिती, संक्रमण शिबिरांची संख्या, तेथील अडचणी, शासनाचे अर्थसहाय्य, झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन याची माहिती देण्यात आली.
प्रत्येक झोपडीचे बायोमेट्रिक सर्वेक्षण व जीआयएस बेस नकाशा यांचे एकत्रीकरण करून झोपडपट्टी माहिती प्रणाली विकसित करण्यात आल्याचे बैठकीत सांगण्यात आले. नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून सुटसुटीत लेटर ट्रॅकिंग सिस्टिम प्राधिकरणाने विकसित केली आहे. एका क्लिकवर नागरिकांना त्यांच्या अर्जाची स्थिती कळू शकते अशी सुविधा यात आहे. नागरिकांना “आसरा” या मोबाईल ॲपद्वारे झोपडीची माहिती, प्रस्तावित योजना, आशयपत्र झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र याबाबतची माहिती पुरवण्यात येते. 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत आसरा ॲपला एकूण 1.02 कोटी हिट्स मिळाल्या आहेत, अशी माहितीही बैठकीत देण्यात आली.
प्राधिकरणाच्या या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.