सोलापूर येथे २३ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
सोलापूर : जीवनात प्रगती करायची असेल तर सातत्याने प्रयत्न करण्याची आवश्यकता असते. खेळ सातत्याने प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा देतात, असे प्रतिपादन कुलपती तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
तेविसाव्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे झाले. त्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस, कुलसचिव डॉ.विकास घुटे, प्रभारी प्र-कुलगुरु डॉ. विकास कदम, क्रीडा संचालक सुरेश पवार आदी उपस्थित होते.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, खेळ दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनायला हवा. कारण खेळामुळे शरीर स्वस्थ राहते आणि स्वस्थ शरीरात कणखर मन असते. खेळ खिलाडूवृत्ती वाढीस लावतात. ज्यामुळे जीवनातील कोणत्याही आव्हानाला सामोरे जाणे शक्य होते.
महाराष्ट्रातील फार कमी खेळाडूंना ऑलिम्पिक स्पर्धेत यश मिळवता आले आहे. या क्रीडा महोत्सवातून ऑलिम्पिक पदक पटकावण्याची जिद्द बाळगणारे खेळाडू तयार होतील, अशी अपेक्षा मला आहे, असे राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले.
कुलगुरू डॉ.फडणवीस यांनी क्रीडा स्पर्धेबाबत आणि त्यासाठी केलेल्या तयारी बाबत माहिती दिली.
तत्पूर्वी, विविध विद्यापीठाच्या संघांनी शानदार संचलनाने राज्यपाल कोश्यारी यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले.
श्री.पवार यांनी प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ.घुटे यांनी आभार मानले.
या स्पर्धेत राज्यातील वीस विद्यापीठातील 2703 खेळाडू सहभागी झाले आहेत. 350 संघ व्यवस्थापक आणि 400 पंचही या स्पर्धेसाठी आले आहेत. या स्पर्धेसाठी आले आहेत. या स्पर्धेच्या नियोजनासाठी विद्यापीठ प्रशासनाने अतिशय नियोजनबद्ध व्यवस्था केली आहे.