नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसंग्रही कार्यकर्ते सन्मार्गी जीवनाचा मार्ग दाखवतात, त्यांचे अनुकरण आणि आचरणातून समाजाला नवी प्रेरणा मिळते, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. काल अंबाजोगाई इथं, भारतीय इतिहास संकलन योजनेचे महासचिव तथा संघाचे प्रचारक डॉ. शरद हेबाळकर यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात भागवत बोलत होते.

राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख शांताक्का यावेळी उपस्थित होत्या. निरपेक्ष भावनेने केलेलं कार्य उदासीनता दूर ठेवतं, हेबाळकर कुटुंबाने निरपेक्ष भावनेनं राष्ट्रकार्यात आयुष्य समर्पित केलं, या शब्दांत शांताक्कांनी हेबाळकर यांचा गौरव केला.

शरद हेबाळकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शरयू हेबाळकर यांचा यावेळी शाल आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना हेबाळकर यांनी अंबाजोगाईकरांच्या कायम ऋणात राहू, या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.