नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 102 लाख कोटी रुपये किंमतीच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं आज उद्घाटन केलं. त्यांनतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या स्वातंत्र्यदिनी केलेल्या घोषणेनुसार येत्या 5 वर्षांत ही कामं करण्यात येणार आहेत.

2019 ते 2025 करिता राष्ट्रीय पायाभूत पाईपलाईन प्रकल्पावर काम करणा-या कृती-दलाचा अहवाल सीतारामन यांच्या हस्ते यावेळी प्रकाशित करण्यात आला. प्रधानमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिनाला केलेल्या घोषणेनंतर गेल्या चार महिन्यांच्या अल्पावधीत या कृतीदलानं 70 हून अधिक भागधारक आणि अन्य मान्यवरांशी चर्चा करुन हा अहवाल तयार केला आहे.

या पाईपलाईन प्रकल्पासोबत आणखी 3 लाख कोटींचे प्रकल्पही जोडले जातील असंही त्या म्हणाल्या. ऊर्जा रेल्वे नागरी सुविधा, जलसंधारण, शिक्षण, आरोग्य इत्यादी विविध क्षेत्रातले उपक्रमही यात समाविष्ट आहेत. 2025 पर्यंत अशा राष्ट्रीय प्रकल्पांच्या पूर्ततेने भारत नक्कीच 5 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट पूर्ण करेल असंही त्या म्हणाल्या.