नवी दिल्ली : केंद्र सरकारने कॅबीनेट समित्यांची पुनर्रचना केली आहे. आर्थिक व्यवहार, संसदीय कार्य, राजकीय व्यवहार, सुरक्षा, गुंतवणूक आणि विकास, रोजगार आणि कौशल्य विकास, नियुक्त्या, निवास या कॅबिनेट समित्यांची फेररचना करण्यात आली आहे.

गुंतवणूक आणि विकास कॅबीनेट समितीमधे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत गृह मंत्री अमित शहा, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, वित्त मंत्री निर्मला सीता रामन, रेल्वे मंत्री, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल या केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे.

रोजगार आणि कौशल्य विकास कॅबीनेट समितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, निर्मला सीतारामन, नरेंद्रसिंह तोमर, पियुष गोयल, रमेश पोखरियाल निशंक, धर्मेंद्र प्रधान, डॉ. महेंद्रनाथ पांडे या केंद्रीय मंत्र्यांबरोबर संतोष कुमार गंगवार, हरदीपसिंह पुरी या स्वतंत्र कार्यभार असलेल्या राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. तर नितीन गडकरी, हरसिमरत कौर बादल, स्मृती इराणी हे केंद्रीय मंत्री आणि प्रल्हाद सिंह पटेल या स्वतंत्र कार्यभार असणाऱ्या राज्यमंत्र्यांना विशेष निमंत्रित म्हणून समितीत स्थान देण्यात आले आहे.

आर्थिक व्यवहार कॅबीनेट समितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, डी व्ही सदानंद गौडा, निर्मला सीतारामन, नरेंद्र सिंह तोमर, रवी शंकर प्रसाद, हरसिमरत कौर बादल, डॉ. एस जयशंकर, पियुष गोयल आणि धर्मेंद्र प्रधान यांचा समावेश आहे.

सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत राजनाथ सिंह, अमित शहा, निर्मला सीतारामन आणि डॉ. एस जयशंकर यांचा समावेश आहे.