गोदावरी शेतकरी कंपनीच्या दिनदर्शिकेचे मुंबईत प्रकाशन
मुंबई : शेतकऱ्यांना हंगामनिहाय शेतीविषयक माहिती मिळण्यासाठी शेतकऱ्यांच्याच कंपनीने तयार केलेली दिनदर्शिका उपयुक्त ठरेल. यातून तंत्रज्ञान विस्ताराचे काम प्रभावीपणे होईल, असे गौरवोद्गार कृषी व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काढले.
गोदावरी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या कृषी दिनदर्शिकेच्या प्रकाशन प्रसंगी श्री. देसाई बोलत होते. शेतकरी कंपन्यांची शीर्ष संस्था असलेल्या “महाएफपीसी”चे व्यवस्थापकीय संचालक योगेश थोरात यांनी दिनदर्शिका निर्मितीमागील संकल्पना विशद केली. ते म्हणाले, गोदावरी फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने आपल्या कार्यक्षेत्रातील पिकांच्या काढणीपासून ते मळणी व विक्रीपर्यंतची माहिती दिनदर्शिकेतून दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना कीड रोग नियंत्रणापासून ते पिकांच्या उत्पादकता वाढीपर्यंतची सर्व माहिती उपलब्ध होते.
यावेळी आयकर विभागाचे सह आयुक्त डॉ. उज्ज्वल चव्हाण, एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय काटकर, नारायण कराड, आप्पासाहेब गोरडे, शेतमाल बाजार अभ्यासक दीपक चव्हाण, गोदावरी फार्मर्स कंपनीचे संचालक सूर्याजी शिंदे, कार्यकारी अधिकारी अमोल धवन आदी उपस्थित होते.