मुंबई : महिला व बालकांवर होणारे अत्याचार तसेच सायबर गुन्हे रोखण्यासाठी व यासंदर्भातील कायद्याची माहिती व्हावी, यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी दि. 3 जानेवारी रोजी राज्यभर एकाच दिवशी ‘सायबर सेफ वुमन’ ही जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासन, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र सायबर यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येणार आहे. डिजिटल युगात इंटरनेटच्या माध्यमातून अनेक प्रकारचे सायबर गुन्हे होत आहेत. यामध्ये विशेषतः महिला व बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. इंटरनेटच्या मदतीने महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक आदी गुन्हे होत आहेत. सायबर गुन्ह्यांची तसेच अशा गुन्ह्यासंदर्भातील कायद्यांची माहिती सर्वसामान्यांना व्हावी, यासाठी महाराष्ट्र सायबरच्या वतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दोन ठिकाणी ‘सायबर सेफ वुमन’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये सायबर गुन्ह्यांची माहिती देणाऱ्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यांमधील मंत्री, लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी/कर्मचारी, शाळा/महाविद्यालयांमधील विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका, अंगणवाडी सेविका, विविध स्वयंसेवी संस्था, महिला दक्षता समितीचे सदस्य यांच्यासह महिला व बालके सहभागी होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी दिली.
या मोहिमेत इंटरनेटवरील फिशिंग,विवाहविषयक साईटवरील फसवणूक ओळख चोरी, फोटोमधील फेरबदल, बँकांसंदर्भातील फसवणूक, बालकांसंदर्भातील पोर्नोग्राफी, सायबर बुलिंग, ऑनलाईन गेमिंग, खोटी माहिती देणारी संकेतस्थळे, सायबर मानहानी यांची माहिती व यापासून प्रतिबंधात्मक उपाय यासह सायबर गुन्ह्यासंदर्भातील कायदे तसेच समाजमाध्यम (सोशल मीडिया) वापरण्यासंदर्भातील घ्यावयाची काळजी याची माहिती जिल्ह्यांमधील कार्यशाळेत देण्यात येणार आहे.
जबाबदार नेटिझन्स तयार करण्यासाठी जागरूकता हा एक महत्त्वाचा पैलू असून या मोहिमेमुळे महिला आणि मुलांना चांगल्या सायबर पद्धतींविषयी जागरूक करण्यात येणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या मोहिमेसाठी विशेष पुढाकार घेतला आहे.
बदलत्या काळात गुन्हेगारी विश्वही नवनवीन माध्यमांचा वापर करत आहे. डिजिटल युगात गुन्हेगार इंटरनेटचा वापर करून सायबर गुन्हे करत आहेत. त्यातून महिला व बालकांचे लैंगिक शोषण व फसवणूक करत आहेत. अशा घटनाविरुद्ध जनजागृती करण्यासाठी सायबर सेफ वुमन ही मोहीम महत्त्वाची ठरणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.