नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यांच्या मागणीनुसार आयात करण्यात आलेला कांदा त्या त्या राज्यांनी उचलावा अशी सुचना केंद्रीय अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनी केली आहे. राज्यांनी एकूण ३३ हजार टन आयात कांद्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. त्यापैकी १२ हजार टन कांद्याचा साठा विविध बंदरात दाखल झाल्याचं पासवान यांनी नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत सांगीतलं.
दरम्यान काही राज्यांनी आपली मागणी मागे घेतली. या राज्यांना पत्र लिहून मागणी केलेला कांदा उचलण्यास सांगण्यात आल्याचं पासवान यांनी सांगीतलं. हा कांदा ४९ ते ५८ रुपये किलो दराने उपलब्ध करुन देता येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
‘एक राष्ट्र एक रेशन कार्ड’ या योजनेची अंमलबजावणी १२ राज्यात केल्याची माहितीही पासवान यांनी यावेळी दिली. रोजगाराच्या शोधात देशभर फिरणाऱ्या मजूर आणि कामगार वर्गाला याचा फायदा होईल, असं ते म्हणाले. खाद्य तेलाच्या वाढलेल्या किंमतीबाबत सरकार गंभीर असून कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कारवाई होईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.