महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तीन पक्षांचे मिळून राज्यात महाआघाडी सरकार स्थापन झाले. मात्र एक महिना उलटला तरीही मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आलेला नव्हता. या मंत्रिमंडळ विस्ताराला पक्षातून असलेली नाराजी, इच्छुकांची भाऊगर्दी, यामुळे हा मंत्रिमंडळ विस्तार लांबला होता. अखेर जनतेमध्ये होत असलेल्या चर्चेमुळे मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडला. ३० डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात पहिल्यांदा निवडून आलेले शिवसेना युवानेते आ. आदित्य ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आणि शिवसेनेतील अनेकांच्या भुवया उंचावल्या. वीस-पंचवीस वर्षे आमदार असलेले मंत्री होऊ शकले नाहीत. मात्र शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांचा मंत्रिमंडळातील समावेश अनेकांना रुचला नाही; परंतु उघडरीत्या व्यक्त व्हायचे नाही, ही शिवसेनेची रित नाही; परंतु आदेश मानून काम करणा-या शिवसेनेत आता सारेच बदल घडले आहेत. ज्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर सत्तेपासून दूर राहाणे पसंत केले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकांना सत्तापदावर बसवले. सर्वसामान्य शेतक-यांच्या मुलांना आमदार, नगरसेवक, मंत्री बनविले; परंतु नेहमी सत्तेपासून दूर राहिले; परंतु शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र मातोश्रीचे सर्व नियम, संकेत बाजूला ठेवून केवळ सत्ता आणि पद एवढेच उद्दिष्ट समोर ठेवून सर्व तडजोडी करण्यात पुढचे पाऊल टाकले. यातील अनेक तडजोडी काँग्रेसची आघाडी शिवसैनिकांना मान्यच नव्हती; परंतु शिवसेनेनेचा मुख्यमंत्री बसणार एवढ़या एकाच विचाराने ते आनंदी होते; परंतु जेव्हा सोमवारच्या मंत्रिमंडळ विस्तारात आदित्य ठाकरे यांचा झालेला समावेश जुन्या-जाणत्या शिवसेना नेते, पुढा-यांना रुचला नाही. विदर्भ- मराठवाड़यातील शिवसेना आमदार कमालीचे नाराज झाले.

कोकणातील मातोश्री निष्ठेच्या गावगप्पा सांगणा-या आ. रामदास कदम यांना त्यांची नाराजी लपवता आली नाही. शिवसेना नेते खा. संजय राऊत यांचे बंधू आ. सुनील राऊत हे देखील नाराज झाले. माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांच्यावर सतत टीका करून मातोश्रीची बेगडी निष्टा दाखवणारे आ. दीपक केसरकर यांनाही आपणावर अन्याय झाल्यासारखे वाटते. वास्तविक दीपक केसरकर यांचे शिवसेनेतील वय किती? असा प्रश्न शिवसैनिकच विचारत आहेत. रत्नागिरीचे आ. उदय सामंत यांना मंत्रीपद मिळाले, मात्र राजापूरचे आ. राजन साळवी यांच्यावर अन्याय झाला, असे काही शिवसैनिकांना वाटते.

कोकण नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिला आहे; परंतु शिवसेनेत काँग्रेसी विचाराचे पुढारी राजकीय स्वार्थासाठी दाखल झाले. त्यानंतर शिवसैनिक सत्तेपासून बाजूलाच राहिला. काँग्रेस विचाराचे पुढारी शिवसेनेत दाखल झालेले असले तरीही ते कधीच शिवसैनिक पचवू शकले नाहीत. याचे कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने भारलेला शिवसैनिक तो प्रामाणिकपणे काम करत राहणारा असतो; परंतु नव्या शिवसेनेत तो दखलपात्र नाही. हे आता शिवसैनिकांना समजून आले आहे. मुंबईत देखील सुनील प्रभू यांना यावेळीही गटनेतेपदावरच समाधान मानावे लागले आहे. अनेकांच्या मनात खदखद आहे; परंतु ती व्यक्त करता येत नाही. यामुळेच शिवसेनेतील अनेक नेत्यांची अवस्था ‘सहन होत नाही आणि सांगताही येत नाही’ अशीच काहीशी झाली आहे.

नेत्यांची ही नाराजी मागील पाच वर्षातही कायम होती. मागील पाच वर्षात विधान परिषद सदस्यांना मंत्रीपदे शिवसेनेने दिली होती; यामुळे विधानसभा निवडणुकीत संघर्ष करून निवडून आलेले आमदार तब्बल पाच वर्षे प्रतीक्षेतच राहिले. त्यातील अनेकांना पुन्हा निराशाच पदरी आली. ही नाराजीही मोठ़या प्रमाणावर आहे. मातोश्रीकडून जमविण्यात आलेली सत्ता समीकरणे सर्वसामान्य शिवसैनिकांना रुचलेली नाहीत. राज्यात सत्ता आहे, म्हणून सर्वसामान्य शिवसैनिकांना त्याचा काही उपयोग होईल, असे आता शिवसैनिकांनाच वाटत नाही. कोकणातील शिवसैनिकांनीही शिवसेनेच्या मंत्र्यांची अकार्यक्षमता चांगलीच अनुभवली आहे.